Wednesday 31 August 2016

सतीश माथूर राज्याचे नवे पोलीस महासंचालक
“सुखरुप जनता आणि सुरक्षित महाराष्ट्र’ हे माझे कर्तव्य आणि मिशन आहे”

कुणाल जाधव
8976629534

भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सतीश माथूर यांची राज्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. माथूर सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीचे महासंचालक म्हणुन काम पाहत होते.
राजकीय नेत्यांपेक्षाही महाराष्ट्रातल्या कर्तबकार पोलीस आणि प्रशासकीय आय. ए. एस. आणि आय.पी. एस्. अधिकार्‍यांची परंपरा अधिक गौरवशाली आणि अभिमानास्पद आहे. इतर राज्यांबाबत असे ऐकायला मिळते की तेथील अधिकार्‍यांवर राजकीय नेत्यांचा वरचष्मा, दबाव आणि हस्तक्षेप वाजवीपेक्षा जास्त असतो. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नुकतीच सतीश माथूर यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. 
सतीश माथूर यांना महाराष्ट्र, तळहातावरच्या रेषांसारखा, परिचित असावा. ते प्रत्येक पक्षाच्या हर एक नेत्याला जाणून आहेत. राजकीय अंतःप्रवाहांचा त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक चळवळी, आंदोलने, संघर्ष आणि समीकरणे, त्यांनी वेळोवेळी जवळून, पाहिली, अनुभवली आहेत. पक्षांची आणि नेत्यांची ‘बलस्थाने’ आणि ‘कच्चे दुवे’ त्यांना ठाऊक असल्याने त्यांना कशा पद्धतीने हाताळून शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखायची याची त्यांना कल्पना आहे. 
एकेकाळी मुंबईत ‘अंडरवर्ल्ड’ आणि मुंबईबाहेर ‘क्रिमिनल गँगस्टर्स’चे आव्हान पोलीस दलापुढे होते. 
मुंबईतल्या उद्योग, व्यापार, व्यवसायातील सधन लोकांना होणारा ‘खंडणी’चा उपद्रव ही एक समस्या पूर्वी होती, आता त्याची तीव्रता कमी झालेली असली तरी खंडणीसाठी धमक्या-अपहरण-खून हा विषय संपलेला नाही.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेच्या विशेष अपेक्षा आहेत कारण आजवरची त्यांची कामगिरी ‘विशेष’ आहे आणि व्यक्ती म्हणूनही सतीश माथूर ‘विशेष’ आहेत. 
सतीश माथूर यांना अनुकूल अशा काही गोष्टी आहेत, त्यातली एक म्हणजे त्यांचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना स्वातंत्र्य देणारे, लोकहिताच्या निर्णयात पाठराखण करणारे आणि अकारण, अवाजवी हस्तक्षेप न करणारे आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘सुखी’ महाराष्ट्राचे स्वप्न, डी.जी. सतीश माथूर यांनी सांभाळलेल्या ‘शांत’ महाराष्ट्रातच साकार होऊ शकणार आहे. त्यामुळेच देवेंद्रांनी सतीश माथूर यांची एका विश्वासाने या पदावर नियुक्ती केली आहे. 
सुदैवाने मुंबईत दत्ता पडसलगीकरांसारखे समर्पित आणि सम्यक व्यक्तिमत्वाचे पोलीस आयुक्त आहेत तर महाराष्ट्राचे महासंचालक सतीश माथूर यांच्यासारखे ‘रोल मॉडेल-आयकॉनिक-अ‍ॅडमिनीस्ट्रेटर’ आहेत त्यामुळे पोलीस दलाबद्दलची विश्वासार्हता वादातीत आहे. ‘दिल्या शब्दाला जागणारं, चारित्र्यसंपन्न नेतृत्व’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राजकीय क्षेत्रात लाभलेले असताना, मुंबई आणि महाराष्ट्रातील पोलीस दलाची सूत्रे दत्ता पडसलगीकर आणि सतीश माथूर यांच्यासारख्या कर्तृत्ववान प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हाती असावीत ही गोष्ट महाराष्ट्राला निश्चित आणि निर्धास्त करणारी आहे.

No comments:

Post a Comment