Thursday 1 September 2016

कर्तव्याचा आणखी एक बळी
वाहतुक पोलीस विलास शिंदे यांचे निधन

कुणाल जाधव
8976629534
मुंबई : आठ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली. 23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंना दोन मुलांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती.
विलास शिंदेंची नेत्रदान करण्याची इच्छा होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र शवविच्छेदनानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. शवविच्छदानानंतर शिंदेंचं पार्थिव त्यांच्या वरळीतील राहत्या घरी आणले जाणार आहे.

विलास शिंदेंना केलेल्या मारहाणीचे कारण काय तर विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍याला थांबवले आणि लायसन्सची मागणी केली. पण गुंडांच्या मारहाणीत एकट्या विलास शिंदेंचा मृत्यू झाला नाही तर इथली कायदा आणि सुव्यवस्था किती मरणासन्न अवस्थेत आहे, याचे दर्शन घडले.
विलास शिंदेंना मारहाण करणारा आरोपी अहमद महमद अली कुरेशीसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली आहे. पण त्यामुळे विलास शिंदेंचा गेलेला जीव पुन्हा परत येणार नाही. मतांच्या राजकारणासाठी मुस्लिम टोळक्याला हात लावला जात नाही, असा आरोप करत राज ठाकरेंनी मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग दिला आहे. 
देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून क्राईम रेट कमी झाल्याचा दावा मोठ्या आवेशात करतात. पण थेट वर्दीवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. शशिकांत कालगुडेनं महिला कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली होती. तुमसरच्या आमदाराने पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावली होती. तर आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकार्‍याच्या अंगावर हात उचलला होता. 
अशा घटनांमुळे छोट्या-मोठ्या गावगुंडांची हिंमत वाढते आणि ते सहज पोलिसांवर हात उचलतात. त्यामुळेच विलास शिंदेंचा बळी गेला आहे. आता तरी देवेंद्र फडणवीसांनी आकडेमोकड करत आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा गांभीर्याने विचार करावा आणि पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होणार नाही. अशा कायद्याचा धाक निर्माण करावा. हीच विलास शिंदेंना खरी श्रद्धांजली ठरेल. 
...........................................
मुख्यमंत्र्यांना घेराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला.
...........................................
25 लाखांची मदत
विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.
...........................................
      हि घटना अतिशय निंदनीय आहे. पोलीसदलातर्फे याचा निषेध आहे. ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे त्याच्या भावाने निर्दयीपणे केले हा हल्ला विलास शिंदे सेवेत कार्यरत असताना होणे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे तो मुलागा अल्पवयीन असतानाही त्या मुलाला गाडी दिल्याबद्दल त्याच्या घरातील जबाबदार व्यक्तीवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
अनिल पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक (माणिकपूर पोलीस स्टेशन)

2 comments:

  1. Kunal very good... i like ur artwork as well as content also. Good! Keep it up.. God bless you!

    ReplyDelete